सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार

सातारा   -शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी गेले सलग दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जावळी, वाई, महाबळेश्‍वर या पश्‍चिम भागातील तालुक्‍यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढला आहे. दुसरीकडे कास आणि ठोसेघर या पठार भागात आज दिवसभर मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घरी थांबणेच पसंत केले.

मान्सूनचे आगमन वेळेत झाली. मात्र, पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. त्यातच सातारा तालुक्‍यातील ठोसेघर, कास पठार परिसरात तसेच जावळी तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांनी भात लागण केली होती.

म्हणावा असा पाऊस पडत नसल्यामुळे भातासह अन्य पिके हातची वाया जातात की काय, अशी भीती निर्माण झाली असतानाच शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी संततधार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी दिवसभर सातारा शहरासह खेड, विकासनगर, संगमनगर, संगम माहुली, क्षेत्रमाहुली, खावली, सोनगाव, महागाव, चिंचणेर वंदन, जैतापूर, तासगाव, गोजेगाव, शेंद्रे, लिंब, वाढे, पाटखळ, आरळे, वडूथ, शिवथर, मालगाव, जकातवाडी, डबेवाडी, परळी, पांगारे, सांडवली, केळवली यांसह तालुक्‍यातील अन्य ठिकाणी पावसाच्या सरी दिवसभर कोसळत होत्या.

रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात म्हणजेच जावळी, वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी येथे आज सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पाटण तालुक्‍यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. महाबळेश्‍वर येथे आज 164 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, आज सकाळपासूनच ठोसेघर आणि कास पठार परिसरात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस पडत होता. या परिसराला दिवसभर पावसाने झोडपून काढल्यामुळे हा पाऊस भात पिकासाठी अत्यंत हितकारक मानला जात आहे.

सरासरी 19.8 मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 19.8 मिलिमीटर पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 119.8 मि.लिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी आणि कंसात आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 23.3 (91.7), जावळी 47 (154.8), पाटण 35.0 (157.5), कराड 14.0 (75.0), कोरेगाव 9.7 (84.7), खटाव 7.8 (46.0), माण 3.6 (118.3), फलटण 0.7 (65.4), खंडाळा 2.7 (45.0), वाई 18.3 (120.4), महाबळेश्‍वर 85.6 (636.3).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.