कराड, पाटणला मुसळधार पावसाचा फटका

अनेक फरशी पूल पाण्याखाली; धामणी, कुठरे, काढणे, पवारवाडी गावांचा संपर्क तुटला

कराड  (प्रतिनिधी) –निवडणूक प्रचार थांबला आणि पावसाने आपला प्रचार चालू केला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. कराडसह पाटण तालुक्‍यात गेली दोन दिवसापासून परतीच्या पावसाने जोरदार फटकेबाजी केल्याने अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झाले आहे. तर पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
ढेबेवाडी (वार्ताहर) –पाटण तालुक्‍यातील ढेबेवाडी विभागात तळमावले, काळगाव यासह परिसरात मुसळधार पावसाचा पुन्हा एखदा हाहाकार पहायला मिळाला. या पावसाने ठिकठिकाणच्या गावांचे फरशी पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटण्याच्या घटना घडल्या आहेत.
धामणी, पवारवाडी, कुठरे पूलावरुन पाणी वाहू लागल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली. फरशी पूलावरुन पाणी जात असल्याने या गावांची वाहतूक ठप्प झाली आहे.  काढणे पूल पाण्याखाली गेल्याने काढणेसह तुपेवाडी, बागलवाडी या गावांचा मुख्य रस्त्याशी असलेला संपर्क तुटला आहे. मौजे धामणी येथील पुलाचे काम सुरु असल्याने तात्पुरता भराव टाकून तयार केलेला रस्ता वजा पूल मुसळधार पावसाने वाहून गेला. नवीन भराव टाकून रस्ता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
मुसळधार पावसाने ढेबेवाडी बाजारपेठेतील दुकांनामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
हेळगाव  (वार्ताहर) – शनिवारी सायंकाळी प्रचाराची सांगता झाली आणि दुपारपासून पावसाने झोडपून काढले आहे. महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत असून याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्‍यता दिसत आहे. एकंदरीत आताचा पाऊस हा नुकसान करणारा असून पाऊस…नको रे बाबा. असंच म्हणण्याची वेळ सर्वांवर आली आहे.

नेहमीप्रमाणे परतीचा पाऊस या दिवसात अपेक्षित असतो. आणि तस झालंही. सहा ते सात दिवस सलग परतीचा पाऊस पडला. आणि या दोन दिवसात वातावरण बदलून गेले. काही भागात तर ढगफुटी झाल्यासारखं कमी वेळात जास्त पाऊस पडला आहे. सध्याच्या पडणाऱ्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून सोयाबीन, भुईमूग ही आंतरपीके वाया गेली आहे. ही दोन्हीही पीक काढण्यास आली आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे ही पिके काढणे शक्‍य होत नाहीत. मिळणारे उत्पन्न जर कमी झाले तर त्याचा परिणाम सहजिकच दरावर होणार आहे. दर चांगला मिळेल, पण उत्पन्न घेता येईना अशी अवस्था झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)