पिंपरी – परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने पुन्हा एकदा शहराला झोडपून काढले आहे. दुपारपर्यंत ऊन आणि उकाडा जाणवत होता. अचानकच सायंकाळी पाचच्या सुमारास काळ्याकुट्ट ढगांनी आकाश व्यापले. अवघ्या काही मिनिटातच विजेच्या लखलखाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला.
पावसाळ्याच्या सुरुवातीला जेवढ्या तीव्रतेने पाऊस पडला नाही, त्याहून कित्येक अधिक तीव्रतेने सध्या पाऊस पडत आहे. गेल्या एक आठवड्यापासून 24 तासांत एकदा तरी शहराच्या कुठल्या ना कुठल्या भागात मुसळधार पाऊस पडतो. परंतु बुधवारी सायंकाळी मात्र संपूर्ण शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
मंगळवारी रात्री व बुधवारी (दि.21) सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले. विजाचा लखलखाट आणि मेघगर्जनेसह सरी कोसळल्या. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. अनेक रस्त्यांना काही मिनिटांच्या पावसाने तळ्याचे स्वरुप आले होते. वल्लभनगर येथील रस्त्यावर केबलच्या वायर कोसळल्या होत्या. अग्निशामक दलाने त्या हटविल्या.