पुणे वेधशाळेचा अंदाज : पुढील दोन दिवस जोरदार पावसाचे
पुणे – शहरासह जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली असून, शुक्रवारी (दि.1) सायंकाळी जोरदार सरी झाल्या. तर काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान, पुढील 7 दिवस पाऊस शहरात “ठाण मांडणार’ असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
1 ऑक्टोबरला शहरासह जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील जुन्नर, भोर, मुळशी, मावळ, आंबेगाव, खेड, वेल्हा, पुरंदर या तालुक्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शहर आणि उपनगरांत मागील 4 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. उन्हाचा चटका वाढत असताना “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ याप्रमाणे पाऊसही शुक्रवारी पुन्हा बरसला. सकाळपासून हवामान कोरडे होते. ऊन पडल्यामुळे पाऊस गेला अशी शक्यता होती. मात्र, दुपारनंतर काळे ढग दाटून आले आणि क्षणात जोरदार पावसाला सुरुवात झाली.
पुणे जिल्ह्यात पुढील 24 तासांत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, दि. 6 आणि 7 नोव्हेंबरला शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे कमाल तापमान 29 तर, किमान 20 अंश सेल्सिअस असेल. दरम्यान, पावसामुळे हवामान बदल झाला असून, थंडी आणि पाऊस असा अनुभव नागरिक घेत असून, यंदाचा ऑक्टोबर महिना पावसातच गेला.
नागरिकांनो, काळजी घ्या
शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे. हा पाऊस ढगफुटीसारखा पडू शकतो, त्यामुळे काही मिनिटात पाणी साठत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांनी या पाण्यात जावू नये. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. ग्रामीण भागातील नागरिकांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी, नदीकाठच्या लोकांनी सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.