कोकणासह नाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी

गोदावरीसह अनेक नद्यांनी ओलांडली धोक्‍याची पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई/नाशिक – कोकणासह नाशिकमध्ये काही दिवसांपूासन मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे वाशिष्ठा आणि जगबुडी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. तर गोदावरी नदीला पूर आला आहे. संततधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. रतर त्नागिरी, खेड चिपळूणलाही पावसाने झोडपून काढले आहे. खेडमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा जिल्हयातील जगबुडी नदीच्या पाण्याची सध्याची पातळी 6.40 मीटर असून 6 मीटरनंतर धोक्‍याचा इशारा दिला जातो. त्यामुळे खेड शहरातील नदीकाठावरील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने वाशिष्ठा आणि जगबुडी या दोन नद्यांना पूर आला आहे.

चिपळूण बाजारपेठेतही पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे बाजारपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल पाण्याखाली गेल्याने पुलावरील महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहतूक गुहागर बायपासवरून वळवण्यात आली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे शुक्रवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुक्काम ठोकल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे गोदावरीसह उपनद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, येथे पुढील काही तासांमध्ये अतिवृष्टिची शक्‍यता वर्तवण्यात आली असून गोदावरी नदीमधील पाणी पातळी वाढल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.