घरांमध्ये पाणी शिरले : विद्युत पुरवठाही खंडित
पुणे – गेल्या चोवीस तासांपासून उपनगरांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. तर, येरवडा, विश्रांतवाडी परिसरात घरांमध्ये पाणी शिरले. शिवाय, बहुतांश भागातील वीजपुरवठा सकाळपासून खंडित झाला होता. तसेच, विजेच्या तारांवर झाडे पडल्याने त्या तुटल्या होत्या.
कात्रज : कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, संतोषनगर परिसरात झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी फाद्या तुटल्या. वादळामुळे केबलच्या तारा रस्त्यावर पडल्या होत्या तर दुकानांचे फलक हवेने उडून गेले. मंगळवारी रात्रीपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. बुधवारीदेखील दिवसभर वीज गायब होती. मनपा कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर येणाऱ्या झाडांच्या फाद्या कापल्या नसल्यामुळे त्या वाऱ्यामुळे वाकून रस्त्यावर आल्या होत्या. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना त्रास होत होता.
येरवडा : परिसरातील अनेक घरात पाणी शिरण्यासह झाड पडी आणि ट्रान्सफार्मरला आग लागल्याच्या घटना घडल्या. शिवाय, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गंगाराम कर्णे गुरुजी दवाखाना, लक्ष्मीनगर, यशवंतनगर, नेताजीनगर, मदर तेरेसानगर, भाटनगर, बाराथे वस्ती, जनतानगर, शांतीरक्षक सोसायटी येथे घरात पाणी शिरले होते. रात्रभर जागून येथील नागरिकांना पाणी बाहेर काढावे लागले. जनतानगर येथे रात्री दोनच्या सुमारास ट्रान्सफार्मरला आग लागली. स्थानिकांनी ती आटोक्यात आणली. महावितरणला कळवून येथील वीजपुरवठा खंडित केला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहासमोर चालत्या चारचाकी वाहनांवर झाड पडले. यात कोणीही जखमी झाले नाही.
हडपसर : दुगड चाळ येथील चार घरांवर झाड पडून मोठे नुकसान झाले. याशिवाय, मुंढवा-केशवनगर येथे मुख्यरस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर, मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द भागातही ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या व झाडे मुळासह उन्मळून पडली होती. दरम्यान, मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक सुखावले असले तरी महापालिका प्रशासनाचा फोलपणा पहिल्या पावसात उघड झाला. अनेक भागांत पाणी साचले, तर पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचेही तीनतेरा वाजले. पावसामुळे सोलापूर रस्ता, ससाणेनगर रस्ता, रवीदर्शन सोसायटी चौक, डी-मार्ट रस्ता, माळवाडी, वानवडी येथील फातिमानगर चौक, कै. विठ्ठलराव शिवरकर रस्ता येथे पाणी साचले होते. ससाणेनगर येथील श्रावणधारा सोसायटीत ग्लायडिंग सेंटरमधून मोठ्या प्रमाणात पाणी आले. हे पाणी अनेक घरांमध्ये घुसले.
औंध : बाणेर, पाषाण परिसरात रस्त्यांवरून पाणी वाहात होते. औंध येथे गायकवाड पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यामध्ये झाड पडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. तसेच, पाषाण येथे पंचवटी परिसरामध्ये चारचाकी गाडीवर झाड पडल्याने नुकसान झाले. संध्याकाळी विद्युत पुरवठा खंडित झाला.