नगर – जिल्ह्यात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जोरदार हजेरी लावली. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अकोले तालुक्यात सर्व मंडळात ढगफुटी झाली. तसेच उत्तरेतील श्रीरामपूर, नेवासे, कोपरगाव, संगमनेर या तालुक्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे काही ठिकाणी खरीप पिकांना जीवदान तर काही ठिकाणी नुकसान मिळाले आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, मागील दोन दिवसांत अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. नगर तालुक्यातील विळद परिसरात जोरदार पाऊस कोसळला. नगर शहरातही पावसाचा जोर वाढला होता. भिंगार (52.3 मिमी), चास (31.5 मिमी) या मंडळांतही जोरदार पाऊस झाला. पारनेर तालुक्यात पारनेर (66.3 मिमी), भाळवणी (38.8 मिमी), वाडेगव्हाण (35.3), वडझिरे (35 मिमी), निघोज (39.8 मिमी), टाकळी (74 मिमी) या मंडळांत पाऊस पडला. श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा (35.5 मिमी) आणि काष्टी (35 मिमी), बेलवंडी (49.3 मिमी), पेडगाव (71.8 मिमी) आणि चिंभळा (61.5 मिमी) या मंडळांव्यतिरिक्त अन्यत्र फारसा पाऊस पडला नाही. कर्जत तालुक्यातील भांबोरा मंडळात पावसाने हजेरी लावली. येथे 48 मिमी इतका पाऊस पडला. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव मंडलात 45.3 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. जामखेड तालुक्यातील अरणगाव मंडलात 35.3 मिमी पाऊस पडला. या व्यतिरिक्त दक्षिणेतील तालुक्यात फारसा पाऊस पडला नाही.
उत्तरेत कोसळधार; अनेक मंडलांत अतिवृष्टी
<यंदा पावसाने उत्तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार हजेरी लावली. नेवासे तालुक्यातील नेवासे बुद्रुक मंडलात तब्बल 158 मिमी पाऊस कोसळला. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ (89.5 मिमी), आश्वी (53.5 मिमी) आणि साकूर मंडलात तब्बल 115.8 मिमी पाऊस पडला. अकोले तालुक्यातील अकोले (88.6 मिमी), विरगाव (102.3 मिमी), समशेरपूर (78.3 मिमी), साकीरवाडी (81 मिमी), राजूर (64.3 मिमी), कोतूळ (78.8 मिमी) आणि ब्राह्मणवाडा मंडलात 75.8 मिमी पाऊस कोसळला. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे 109.3 मिमी, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान मंडलात 158 मिमी तर राहाता तालुक्यातील शिर्डी 80.3 मिमी आणि बाभळेश्वर मंडलात 91 मिमी पाऊस एकाच दिवसात कोसळला.