इंदापुरात पावसाची दमदार हजेरी

वादळी वाऱ्याने मका, ज्वारी, बाजरी आदी पिके भुईसपाट

भिगवण – इंदापूर तालुक्‍यात गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने आता परतीच्या वेळी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाल्यानंतर अचानकपणे वारे वाहू लागल्याने काढणीला आलेली मका, ज्वारी, बाजरी ही पिके भुईसपाट झाली आहेत.

इंदापूर तालुक्‍यात आज पहाटे पासून सुरू झालेला पाऊस सरासरी 30.85 मिलीमीटर इतका झाला आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जिरायती भागातील मका ज्वारी, बाजरी व इतर उभ्या पिकांना जीवदान मिळाले. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली होती. काही भागांत पाऊस न झाल्याने दुष्काळी चित्र निर्माण झाले होते, परतीच्या पावसावरच शेतकऱ्यांच्या आशा अवलंबून होत्या. शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी चारच्यादरम्यान आकाशात काळे मेघ दाटून आले होते. शनिवारी पहाटे तीन वाजल्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली. काटी, लोणी देवकर, इंदापूर शहर आणि भिगवण परिसरात मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे रस्त्यावर वाहने आणि वर्दळ काहीशी कमी होती.

  • इंदापुरातील पावसाची आकडेवारी – 
  • इंदापूर – 46.4 मि.मी.
  • भिगवण – 31.0 मि.मी.
  • लोणी देवकर – 40.0 मि.मी.
  • सणसर – 16.0 मि.मी.
  • अंथुर्णे – 23.0 मि.मी.
  • निमगाव केतकी – 26.0 मि.मी.
  • बावडा – 19.0 मि.मी.
  • काटी – 45.4 मि.मी.

Leave A Reply

Your email address will not be published.