बदलापूर – ठाणे जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे बारवी धरणात रविवारी सकाळपर्यंत ८९ टक्के पाणी जमा झाले होते. शनिवारी २४ तासात धरण क्षेत्रात सुमारे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
त्यामुळे बारवी धरण ८२ टक्क्यांवरून थेट ८९ टक्क्यांपर्यंत पोहोचले. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या २४ तासांत सात टक्के पाण्याची भर पडली आहे.
यंदाच्या वर्षात कडक उन्हाळ्यामुळे बारवी धरणाची पाणी पातळी २५ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. त्यानंतर जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरण क्षेत्रातील साठा समाधानकारक नव्हता.
मात्र जुलै महिन्यात पावसाने संततधार का होईना धरणाच्या पाणी पातळीत वाढ केली. सुरुवातीचे तीन आठवडे संथगतीने बारवी धरणात पाणीसाठा जमा झाला.
मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे बारवी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला. २४ ते २६ जुलै या तीन दिवसात बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.