तळेगाव ढमढेरे परिसरात पाच तास धो-धो

तळेगाव ढमढेरे – येथील परिसरात सध्या सर्वत्र झालेल्या पावसाने चांगली हजेरी लावून सलग तीन दिवस रात्री पाच तास धो धो पाऊस बरसला, यामुळे शेतात शेततळ्याचे स्वरूप झाले आहे रस्त्याच्या बाजूने पाणी वाहू लागले सर्वत्र पाण्याच्या पातळ्या वाढल्याचे दिसुन येत आहे परिसरात नागरीक समाधानी झाले आहेत.

तळेगाव ढमढेरे, श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, शिवतक्रार म्हाळुंगी, दहिवडी या परिसरात यावर्षी पाऊस चांगला होऊन नद्या, नाले, विहिरी दुधडी भरून वाहत आहेत. जनावरांचा भेडसावत असलेला चारा आणि पाणी प्रश्‍न सुटल्यामुळे मालक सुटकेचा श्‍वास टाकत असलेचे चित्र दिसत आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. जनावरांना चारा मिळत नव्हता. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्व प्रश्‍न सुटले आहेत.

याचबरोबर भूजलपातळी उंचावली आहे. घरापुढे पाणी साचलेले असल्यामुळे तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहेत. त्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळण्याची शक्‍यता आहे. वातावरणात सतत होणारा बदल हा सजीवांना धोकादायक ठरत आहे. यांपासून माणसाबरोबर जनावरे, पक्षी व इतर जीवांना विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागणार आहे.

तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदीला गेल्या महिन्यापासून सततच्या वाहणाऱ्या पाण्याने शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरवेलची पातळी सुधारली आहे. सुरवात झालेल्या रविवारच्या पावसाने दमदार हजेरी लावली अखंड मंगळवार पर्यंत झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते नागरिकांना भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडता आले नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.