पावसाचा पुन्हा तडाखा

उपनगरांतही जोर : सखल भागांत "तळे'

पुणे – शहराच्या मध्यवर्ती आणि दक्षिण भागावर पावसाचे दाट ढग दाटून आल्याने सोमवारी (दि.21) शहरात दुपारच्या सुमारास पावसाने पुन्हा तडाखा दिला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, पुण्यात सोमवारी संध्याकाळपर्यंत शिवाजीनगर येथे 26 मिमी, तर लोहगाव येथे 9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

 

शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासूनच शहरात जोरदार पावसाने सुरूवात केली. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मात्र, शहरभर ढगाळ वातावरण कायम होते. शहराच्या विविध भागांमध्ये ढगांच्या गडगडाट आणि वाऱ्यासह पाऊस पडत असून, पुढील चोवीस तास पावसाची हीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.

 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहर-उपनगरांत पावसाने अक्षरश: मुक्काम ठोकल्याने ठिकठिकाणी तळी साचत आहेत. या पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. तर, रस्त्यांची पुन्हा चाळण झाली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र व ओडिसाच्या किनारपट्टीवर चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे शहरासहित राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होईल.

– डॉ. अनूपम काश्यपी, वरिष्ठ अधिकारी, हवामान विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.