पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची उडाली भंबेरी

पुणे – पुण्यासाहित राज्यातील सात जिल्ह्यात येत्या तीन तासांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आला होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

दुपारी तीनपासून पुण्याच्या दक्षिण भागात पावसाचे दाट ढग साचले होते. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा सुरू झाला. अन् काही क्षणातच वरूणराजाचे आगमन झाले. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

हाडशी (ता. मुळशी) भागात गारांचा पाऊस

शहरातील सदाशिव पेठ, सिंहगड रस्ता, मार्केटयार्ड, चंदननगर, वडगाव शेरी, कात्रज, सुखसागर, वानवडी, वारजे माळवाडी, बिबवेवाडी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण कोकण ते विदर्भापर्यंत असलेल्या चक्रिय स्थितीमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचा प्रभावामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. 19 फेब्रुवारी पर्यंत पावसाची शक्यता कायम असून, येत्या तीन ते चार तासात पुण्यासाहित नाशिक, धूळे, सोलापूर, नंदूरबार, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा विभागाने दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.