Nashik Rain News – जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोदावरी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काल दिवसभरात 161 मिमी तर आज सकाळपासून 72 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर शहरात मुख्य रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे उद्यापासून पवित्र श्रावण महीन्याला सुरुवात होणार असून त्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि छोटे मोठ्या व्यावसायिकांची तयारी, लगबग सुरु असतांना पूर्वसंध्येला पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. परराज्यातून आलेले अनेक भाविकही पावसामुळे अडकून पडले आहेत..
गंगापूर धरण 80 टक्के भरले
नाशिक जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येत आहे. रविवारी दुपारी 12 वाजता दारणा धरणातून 22966 क्यूसेक, भावली धरणातून 1,218 क्यूसेक, कडवा धरणातून 8,298 क्यूसेक, भाम धरणातून 4,370 क्यूसेक, पालखेड धरणातून 5,570 क्यूसेक तर
गंगापूर धरणातून 4000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 44 हजार 768 क्यूसेकने पाणी मराठवाड्याच्या दिशेने सोडण्यात येते आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.