ज्वारीच्या आगारात उत्पादनात होणार मोठी घट
निमसाखर – इंदापूर तालुका हा ज्वारीचा आगार म्हणून गेली तीस वर्षांपूर्वी ओळखला जात होता. अनेक ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या होत्या. मात्र, गेल्या दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या परतीच्या पावसामुळे ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीच्या उत्पन्नात मोठी घट होणार असून ज्वारीचे दर गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे गोरगरिबांची भाकरी करपणार आहे.
यंदा ज्वारी उत्पादनात मोठी घट होणार असल्याने मार्केटमध्ये विक्रीसाठी येणारी ज्वारीची आवक सुद्धा कमी होत आहे. ज्वारीचे दर वाढू लागल्याने गरीबांची ज्वारीची भाकरी महाग झाली आहे. सर्वसामान्य नागरिक मात्र वाढलेल्या दरामुळे हवालदिल झाला आहे. ज्वारीच्या नुकसानीमुळे जनावरांना लागणारा कडबासुद्धा यावर्षी कमी प्रमाणात मिळणार आहे. सततच्या पावसामुळे ज्वारीचे पीक मात्र ओल्या दुष्काळामुळे हिरावले आहे.
इंदापूर तालुक्यातील शेकडो एकर जळाल्याचे भयानक चित्र होते. दरम्यान, इंदापूर तालुक्यात शेकडो एकरावर प्रशासनाकडून पंचनामे केल्याचे वास्तव आहे. त्यामुळे खाण्यासाठी ज्वारी आणि जनावरांना चारा महागणार आहे. सध्या ज्वारीचा दर चार हजाराच्या जवळ पोहचला आहे. त्यामुळे गोरगरीबांना ज्वारीची खरेदी मुश्किल झाली आहे. सध्या प्रति क्विंटल ज्वारी 2800 ते 3800, बाजरी 1800 ते 2400, गहू 1900 ते 3700 क्विंटल, हरभरा 3751 रुपये, मका 1751 ते 1851 रुपये असे दर आहेत.