मुंबई : राज्यात सध्या पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रिय झाल्याने गणेशोत्सवात मराठवाड्यातही जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सोमवारी संपूर्ण मराठवाड्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले असून वाऱ्यांचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रतितास राहणार आहे.
राज्यात ठिकठिकाणी सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात जोरदार सुरू आहेत. हवामान विभागाने संपूर्ण मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट दिला असून छत्रपती संभाजीनगर,जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. दिवसभर हवामान ढगाळ असून संध्याकाळी वादळी वाऱ्यांची ही शक्यता आहे.
पुण्यासह घाटमाथा परिसरात अतिवृष्टी?
पुण्यासह सातारा घाटमाथ्यावर सोमवारी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. पुणे, सातारा व विदर्भ वगळता सर्वत्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कमाल तापमानात देखील वाढ झाली आहे.
काही ठिकाणी उष्णता जाणवू लागली आहे. मात्र, शुक्रवारी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे पुणे व सातारा घाटमाथ्याचा भाग आणि संपूर्ण विदर्भात पुन्हा पाऊस वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.