पाथर्डी तालुक्‍यात दोन दिवस दमदार पाऊस 

पाथर्डी – गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे जनावरांच्या सोळा छावण्या बंद झाल्या असून तालुक्‍यातील अनेक नद्या, नाले, ओढे व तलावातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस हा पाथर्डी शहर व कोरडगाव येथे झाला. सुदैवाने कोणतीही वित्त हानी पावसामुळे झाली नाही. शनिवारी रात्री तालुक्‍यात पावसाला सुरुवात झाली. चार तास पाऊस झाल्यानंतर पाऊस थांबला. मात्र काल मध्यरात्री पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली.

या दमदार पावसामुळे तालुक्‍यातील अनेक नद्या नाल्याना चांगले पाणी आले. गेल्या वर्षी तालुक्‍यातील अनेक गावांनी वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेत आपल्या गावात जलसंधारणेची कामे केली होती. याशिवाय जलसंधारण योजनेंतर्गत सुद्धा अनेक गावात जलसंधारणेची कामे झाली होती. मात्र पाऊस पडत नसल्याने या कामांचे दृश्‍य परिणाम दिसून येत नव्हते. मात्र गेली दोन दिवस झालेल्या पावसात मात्र अनेक गावातील बंधारे, नद्या नाले व ओढ्यांना चांगलेच पाणी आले.

शहरासह तालुक्‍यातील कोरडगाव, माणिकदौंडी परिसरात पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे चिंचपूर पांगुळ ते जोगेवाडी या रस्त्यावरील पूल एका बाजूने खचला तर कोरडगाव येथील ओढ्याला अनेक दिवसांच्या खंडानंतर चांगले पाणी आले होते. याशिवाय पाथर्डी शहराजवळ असलेल्या नदीला काल रात्रभर पाणी वाहत होते. तर तानपुरवाडी शिवारातील तीन बंधारे पाण्याने पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तालुक्‍यात सर्वदूर हा पाऊस असला तरीही करंजी व मिरी परिसरात पडलेल्या पावसाचे प्रमाण कमी आहे.

तालुक्‍यात जनावरांच्या 129 छावण्या असून दोन दिवस झालेल्या पावसामुळे यातील 16 छावण्या बंद झाल्याने महसूल प्रशासनाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. याशिवाय शेजारील शेवगाव तालुक्‍यातील राणेगाव, शिंगोरी व बोधेगाव परिसरातही दमदार पाऊस झाला असून या परिसरातील नद्या, नाल्यांना चांगले पाणी आले आहे. गेल्या दोन दिवसात तालुक्‍यात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे- पाथर्डी 107 मीमी. माणिकदौंडी 89, मिरी 23, करंजी 33, कोरडगाव 102 तर टाकळी मानूर येथे 69 मीमी. पावसाची नोंद झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.