सातारा -सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने सायंकाळनंतर चांगलाच जोर पकडला. पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने उष्मा कमी होऊन गारवा निर्माण झाला होता. पंधरवड्यापासून उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांना पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळाला.
साताऱ्यासह पश्चिम भागात बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत रिमझिमणाऱ्या पावसाचा सायंकाळनंतर मात्र जोर वाढला. सायंकाळी तब्बल तासभर जोरदार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरात संध्याकाळी तीन तासात 0.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस हेच वातावरण कायम राहाणार असा इशारा हवामान शास्त्रविभागाने वर्तवला आहे.
कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी या तालुक्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. पावसाच्या संध्याकाळी जोरदार सरी कोसळल्या. उष्णतेच्या लाटेमुळे साताऱ्याचा तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे सरकला होता. सातारा शहरात गेल्या आठवड्याभरापासून कमाल तापमान 38 अथवा 40 अंश सेल्सिअसमध्ये नोंदवले गेले.