जगदलपूर – छत्तीसगडमधील जगदलपूरपासून 11 किलोमीटर अंतरावरील माळगावमधील खाण कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा महिलांसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस आणि एसडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील नगरनान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माळगावमध्ये आज खोदकाम सुरू असताना खाणीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांना रुग्णालयात हलवण्यात येत असताना मृत्यू झाला.
या दुर्घटनेत काही लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी पोलीस आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरु केले आहे. आत्तापर्यंत 7 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
दरम्यान, 14 नोव्हेंबरला मिझोरामच्या हंथिया जिल्ह्यातही दगडखाण कोसळल्याची घटना घडली होती. खाणकाम सुरु असताना अचानक मोठे दगड तुटून खाली पडले, यात 12 मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यावेळी आसाम रायफल्स, बीएसएफ, स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्य केले. या अपघातात अडकलेल्या सर्व मजूरांचा मृत्यू झाला होता.