पिंपरी – शहरामध्ये बुधवारी (दि. 14) रात्री गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने वातावरणात सुखद गारवा निर्माण केला होता. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या या पावसात विजेचा लखलखाट आणि कडकडाट धडकी भरविणारा होता. ऐन उन्हाळ्यात या पावसाने नागरिकांना पावसाळ्याची अनुभूती करुन दिली.
दुपारपासून वातावरणात उकाडा होता. सायंकाळनंतर ढग दाटून आले आणि अचानकच वादळ-वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. काही ठिकाणी गारा देखील पडल्या. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली.
रेनकोट आणि छत्रीशिवाय घराबाहेर पडलेल्या दुचाकी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही दुचाकी चालकांनी दुकानांचे शेड आणि अन्य आसरा शोधत रस्त्याच्या एका बाजुला काही वेळेसाठी थांबणे पसंत केले. शहरातील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. रात्री नऊ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. बालगोपाळांनी गारा वेचण्याचा आनंद लुटला.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्री आठपासून संचारबंदी लागू झाली. त्यामुळे रात्री आठनंतर रस्त्यांवरून अत्यावश्यक सेवेतील वाहनांची वाहतूक सुरू होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने सायंकाळी पिंपरी येथील भीमसृष्टीचा परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना अचानक आलेल्या पावसाने भिजविले. पाऊस थांबण्याची वाट पाहत नागरिक पुतळा परिसराजवळ थांबले होते.