#व्हिडीओ : रायगड जिल्ह्यात मुसळधार, महाडमध्ये पूर परस्थिती

रायगड : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, गाढी, पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. महाड, नागोठणे, रोहा शहरात पाणी शिरल्याने याठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. महाड सावित्री नदीने इशारा पातळी गाठल्याने शहरात बाजारपेठेत पाणी घुसले आहे. तसेच महाडमधील सुकट गल्ली, जुना गाडी तेल येथेदेखील पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

पावसाचा जोर कमी झाल्याने पुलावर, बाजारपेठेत साचलेले पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असुन शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तर नागरिकांनीसुद्धा शक्यतो घराबाहेर पडू नये आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.