राज्यात उष्णतेचा कहर; उष्माघाताचे 7 बळी

पुणे – मागील दोन महिन्यांपासून विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट असल्यामुळे उष्माघाताचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, 15 मार्चपासून आतापर्यंत तब्बल 400 हून अधिक उष्माघाताचे रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 7 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

यावर्षी 15 मार्च ते 20 मेदरम्यान नागपूर, अकोला, औरंगाबाद, लातूर, पुणे आणि नाशिक येथे उष्माघाताचे 418 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये परभणी, बीड, धुळे येथे प्रत्येकी एक आणि औरंगाबाद व हिंगोली येथे प्रत्येकी दोन अशा एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या साथरोग विभागाने दिली. उन्हाचा चटका वाढल्यामुळे त्यासंबंधीच्या इतर तक्रारीदेखील राज्यभरातील रुग्णांकडून वाढत आहेत. याप्रकरणी आम्ही सर्व शासकीय रुग्णालयांना उष्माघाताच्या रुग्णांवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी दिली. या रुग्णांसाठी एक स्वतंत्र खोली तयार करण्यास सांगितले आहे. तसेच ज्या रुग्णांना रक्‍तदाब, मधुमेह, इतर आरोग्यविषयक तक्रारी किंवा आजार असतील, तर त्यांनी उन्हात बाहेर न पडता घरी राहावे. कारण या रुग्णांना उन्हाचा किंवा उष्माघाताचा त्रास होण्याची शक्‍यता अधिक आहे.

पुण्यात अद्याप नोंद नाही
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात अद्याप एकही उष्माघाताचा रुग्ण आढळून आलेला नाही. महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, “महापालिकेच्या प्रत्येक दवाखान्यांमध्ये उष्माघाताचा रुग्ण आला असल्यास त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात यावेत,’ अशा सूचना दिल्या आहेत.

जिल्हानिहाय उष्माघाताचे रुग्ण (स्रोत- राज्य साथरोग विभाग, पुणे)
नागपूर – 143
अकोला – 186
औरंगाबाद – 6
लातूर – 61
नाशिक – 21
पुणे – 1
एकुण – 418

डॉक्‍टर म्हणतात…
राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे “नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करावा. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाच्या तडाख्यामध्ये बाहेर पडून नये. भरपूर पाणी प्यावे. उपाशीपोटी घराबाहेर पडू नये,’ असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.