सोलापुरात उष्णतेची लाट

यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद
सोलापूर – सोलापुरात उष्णतेची भयानक लाट आली आहे. सूर्यनारायण आग ओकू लागल्याने सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान, आज यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. 44.3 दशांश इतकं तापमान आज आहे. गेल्या चार वर्षात इतकं तापमान नोंदले गेले नव्हते.

या कडक उन्हाने अबालवृद्धांची पुरती दमछाक झाल्याचे दिसून येत आहे. रस्ते सामसूम असून लग्न सराई असतानासुद्धा बाजारपेठामध्ये शुकशुकाट आहे. सोलापूरकरांना दरवर्षी येणार उन्हाळा तसा नवा नाही. मात्र यंदा उन्हाने 42 डिग्री सेल्सियस तापमानाची मर्यादा ओलांडली असून तापमानाची वाटचाल 43 डिग्रीकडे जाताना दिसून येत आहे. कडक उन्हामुळे सोलापूरकर जाम वैतागले आहेत. शासकीय कार्यालयातील कामकाजावरसुद्धा मोठा परिणाम झाला आहे. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. सकाळी आठ वाजता सुरु झालेले ऊन सायंकाळी साडेसहा वाजले तरी कमी होण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांना चटके सहन करताच दैनंदिन कामकाज करणे भाग पडत आहे.

घराबाहेर पडतानाच सोलापूरकरांना डोक्‍यावर टोपी घालून बाहेर पडावे लागत आहे. अंगात पांढरा पोशाख व डोळ्यावर गॉगल घालून सोलापूरकर बाहेर पडत आहेत. याशिवाय वृद्धांची व लहान मुलांची सर्वाधिक दमछाक होत आहे. काहीजण छत्रीचा तर काहीजण पांढऱ्या गमजाचा आधार घेताना दिसून येत आहेत. दुचाकीचे सीट तापल्याने गाडीवरून प्रवास करतानासुद्धा वाहनधारक हैराण आहेत.

दरम्यान, या उष्णतेच्या लाटेचा परिणाम ग्रामीण भागात सर्वाधिक जाणवत आहे. शेतीची कामे उन्हामुळे सकाळच्या सत्रातच आटोपली जात आहेत. शेतावर कामावर जाणाऱ्या शेतमजुरांनीसुद्धा आपल्या कामाच्या वेळा बदलल्या असून सकाळी सात ते दुपारी 12 वाजेपर्यंतच कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. महिना अखेरपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान कमी होण्याला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.