सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली असून घरामध्ये झोपलेल्या एका शेतकऱ्याच्या अंगावर उकळते तेल टाकून खून करण्यात आला आहे. ही घटना माढा तालुक्यातील सापटणे या भागात घडली असून या घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शहाजी गोविंद ढवळे असे त्या शेतकऱ्याचे नाव असून ते ५५ वर्षांचे होते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , मृत शहाजी ढवळे हे सोमवारी रात्री आपल्या घरामध्ये झोपले होते. रात्री दिड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी अनिता शेताला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. याच दरम्यान घराचा दरवाजा उघडा होता. याचाच फायदा घेत दोघा व्यक्तींनी घरात घुसून झोपलेल्या शहाजी यांच्या अंगावर उकळलेले तेल टाकले. या घटनेत ते जखमी झाले आणि त्यांच मृत्यू झाला.या हल्ल्यातून बचावण्याची संधी देखील त्यांना मिळाली नाही. गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुगणालयात नेण्यात आले मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान ही घटना जमिनीच्या आणि रस्त्याच्या किरकोळ वादातून घडल्याची माहिती समोर येत आहे. टेभुर्णी पोलिसांत संतोष राजेंद्र ढवळे, नरसिंह राजेंद्र ढवळे या दोघांवर या शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.