कोल्हापूर – जनावरांसाठी कडबा कुट्टी मशीनने वैरण बारीक करत असताना मशीनचा शाॅक बसून तरूणाचा मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कावणेमध्ये मंगळवारी घडली. शिवदत्त उर्फ सोन्या मारूती पाटील (वय 28) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे. शिवदत्त हा पैलवान होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.
शिवदत्त हा पैलवान होता. त्याचे वजन 107 किलो होते. धिप्पाड शरीरयष्टी होती. त्याने पैलवानकी करत आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. शिवदत्तचे वडील ‘गोकुळ’मध्ये प्रशिक्षण वर्गाचे अधिकारी आहेत. शिवदत्तने कुस्तीमध्ये चांगली ओळख निर्माण केली होती.
शिवदत्त हा पैलवानकी करत घरची जनावरे सांभाळून दुग्ध व्यवसाय करत होता. मंगळवारी तो जनावरांना कडबा चारण्यासाठी कडबा कुट्टीत वैरण बारीक करत होता. नेहमी तो याच कुट्टीतून कडबा बारीक करत असे. मात्र मंगळवारी त्याचे कडबा कुट्टीचे काम सुरू असताना अचानक शाॅक बसला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.
बराच वेळ झाला तरीही शिवदत्त घरी न आल्याने त्याच्या आईने त्याला फोन केला. मात्र तो फोन उचलत नसल्याने आई गोठ्याकडे गेली तेव्हा शिवदत्त कडबा कुट्टी मशीनच्या बाजूस पडलेला दिसला. आईने आरडाओरडा करताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. शिवदत्तला ग्रामस्थांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याघटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.