हृदयद्रावक ! करोनाग्रस्त पोटच्या मुलाचा मृतदेह सोडून आई-बापाने काढला पळ

नवी दिल्ली – करोनाने देशाभरात हाहाकार माजवला आहे. या महामारीने रक्ताची नाती देखील परकी केल्याचं दिसून आलं. तर अनेक ठिकाणी रुग्णवाहिका न मिळाल्याने आपल्या नातलगाचा मृतदेह खांद्यावर किंवा सायकलवर घरी नेल्याचे समोर आलं. तसेच काहींनी करोनाच्या भीतीने आपल्या माता-पित्याचे अंत्यसंस्कार करणं टाळलं. झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून एका दाम्पत्याने करोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या मुलाचा मृतदेह रुग्णालयात सोडून पळ काढला.

दोन वर्षाच्या मुलाला ताप येत असल्यामुळे येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  तेथे त्याचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. अशा स्थितीत या दोन वर्षांच्या बिट्टूचा मृतदेह सोडून त्याच्या आई-बापाने रुग्णालयातून पळ काढला.

दरम्यान रुग्णालयातील वॉर्डबॉय रोहित बेदिया याने त्या बाळाचा अंत्यसंस्कार केला. बिट्टूला ११ मे रोजी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होते. बिट्टूच्या गळ्यात काही तरी अडकल असं सांगत त्याच्या आई-वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्याला करोनाची लागण झालेली होती. बिट्टूला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र दोन दिवसांनी त्याचे निधन झालं.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बिट्टूच्या वडिलांचे नाव सिकंदर यादव होते. त्यांनी दिलेल्या फोननंबर संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र काहीही उत्तर मिळालं नाही. अखेरीस दोन दिवस वाट पाहून बाळाचे अंत्यसंस्कार कऱण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.