लोणी काळभोर – गेले वर्षभर सुरु असलेला करोना, त्यामुळे लावण्यात आलेले लाॅकडाऊन व परिणामी निर्माण झालेली आर्थिक टंचाई याच्या झळा आता ग्रामीण भागातही जाणवू लागल्या आहेत. या आर्थिक टंचाईस कंटाळुन एकाने त्याची पत्नी व १४ महिन्याच्या स्वतःच्या लहान मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केली असल्याची घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
हनुमंत दर्याप्पा शिंदे ( वय ३८, सध्या रा, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मुळ गाव, बक्षीहिप्परग, ता. दक्षिण सोलापुर, जि.सोलापुर ) याने पत्नी प्रज्ञा ( वय २८ ) हिचा गळा आवळून तर लहान मुलगा शिवतेज (वय १ वर्षे २ महीने ) याचा धारदार सुरीने गळा चिरून खुन करून नंतर स्वतः ओढणीच्या सहाय्याने बेडरूममधील पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी मयत हनुमंत याचे वडील दर्याप्पा अर्जुन शिंदे (वय. ६२) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा मुलगा हनुमंत (वय.३८ ), सुन प्रज्ञा (वय. २८), नातु प्रथमेश (वय ७ ), नात (वय ५) व लहान नातु शिवतेज (वय १ वर्षे २ महीने ) तसेच लहान मुलगा सोमनाथ (वय २८ ) वर्षे यांचेसह एकत्र रहाणेस आहेत. हनुमंत हा सिमेंटचे टेम्पोवर ड्रायव्हर म्हणुन कामास होता. त्याची पत्नी प्रज्ञा ही घरकाम करून घरामध्ये शिलाई मशिनवर शिवणकाम करत होती. हनुमंत यास लॉकडाउनमुळे काम नसल्याने तो घरीच होता. तो आर्थिक अडचणीत होता, त्यामुळे पती पत्नीत किरकोळ वाद होत असत.
रविवार (९ मे ) रोजी दर्याप्पा दुपारी १२ वाजता घरी आले. त्यावेळी नातु प्रथमेश व नात ईश्वरी हे हॉलमध्ये टी.व्ही पहात बसले होते. तर मुलगा हनुमंत व सुन प्रज्ञा व नातु शिवतेज हे त्यांचे बेडरूम मध्ये होते. बेडरूमचा दरवाजा आतुन बंद होता. मुलगा व सुन हे नेहमी दुपारी जेवण झाल्यावर बेडरूममध्ये झोपतात त्यामुळे दर्याप्पा बाहेरच थांबले. दुपार उलटुन गेलेनंतरही मुलगा व सुन त्यांचे बेडरूममधून बाहेर आले नाहीत. संध्याकाळी मुलगी जयश्री किसन मोरे हीचा सुन प्रज्ञा हिच्या मोबाईलवर फोन आला. परंतु सुन बेडरूमचे बाहेर आली नसलेने मोबाईल नातु प्रथमेश याने उचलला. सदरवेळी मोबाईल प्रज्ञाकडे देणेस सांगितला असता प्रथमेश याने बेडरूमचा दरवाजा वाजवला परंतु आतून कोणीही दरवाजा उघडला नाही.
रात्री ८ वाजेपर्यंत मुलांनी खुपवेळा बेडरूमचा दरवाजा वाजवूनही उघडला नाही. दर्याप्पा यांचा भाचा दत्तात्रय मोरे, जावई किसन बाबुराव मोरे व धाकटा मुलगा सोमनाथ शिंदे हे घरी आले. सर्वानी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतू काहीच आवाज येत नसलेने आजुबाजुचे लोक तेथे जमा झाले. त्यापैकी चेतन काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फोन करून पोलीसांना माहीती दिली. पोलीसांनी बेडरूमच्या पश्चिमेकडील खिडकीचे जाळीमधुन आत डोकावुन पाहीले असता हनुमंत हा बेडरूम मधील पंख्याला गळफास घेवुन लटकत असलेला दिसला. म्हणुन पोलीसांनी जमलेल्या लोकांच्या मदतीने एक बांबुची काठी घेवुन दरवाजाची कडी आतल्या बाजुने वर उचलली. व आत जावुन पाहीले असता प्रज्ञा हिचा गळा आवळल्याने ती मृत झालेली तसेच तिचे शेजारी नातु शिवतेज याचे गळयावर धारदार सुरीने कापल्याने तो ही मृत झाला असल्याचे दिसले. मृतदेहाची पाहणी करून त्यांचा मृत्यु झाल्याची खात्री झालेने पंचनामा करून तीनही मृतदेह ताब्यात घेवुन पोस्टमार्टमसाठी ससुन हॉस्पीटल पुणे येथे घेवुन गेले.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांनी भेट दिली असुन सदर गुन्हयाचा तपास लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेंडगे हे करीत आहेत.