तरुणांमध्ये वाढतोय ह्रदयरोग (भाग 1)

-डाॅ. संदीप देशमुख

हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण हे प्रौढ वयोगटात अधिक असते, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र, जगातील सर्वाधिक मृत्यूंना कारणीभूत ठरणाऱ्या या विकारांपासून तरुण वयोगटातील व्यक्तीही सुरक्षित नाहीत, याची कुणाला फारशी कल्पना नसते.

“द कोरोनरी आर्टरी रिस्क डेव्हेलपमेंट इन यंग अडल्स्टस्‌’ या गटाने तरुण वयोगटातील व्यक्ती हृदयरोगास बळी पडण्याची शक्‍यता अधिक का असते व त्यांच्या बाबतीत हा धोका उत्पन्न करणारी कारणे कोणती याचा अभ्यास हाती घेतला होता. या संशोधनामध्ये 18-30 वर्षे या वयोगटातील 5000 प्रौढ तरुणांवर 15 वर्षे देखरेख ठेवण्यात आली होती. नेमक्‍या कोणत्या कारणांमुळे त्यांच्यामध्ये हृदयरोगाचा धोका निर्माण झाला, याचा अभ्यास करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिसऱ्या व चौथ्या दशकात प्रत्येक पुरुष या विकाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले. या अभ्यासातील निष्कर्षानुसार ज्या व्यक्ती दिवसाला 10 सिगारेट्‌स पितात त्यांच्यामध्ये हृदयरोग निर्माण होण्याचा धोका 50 टक्के असतो. कोलेस्ट्रॉलच्या पातळीमध्ये झालेली वाढही हृदयाच्या ठोक्‍यांची गती वाढवू शकते व हृदयरोगाचा धोका 50 टक्‍क्‍यांनी वाढतो. रक्तदाबाच्या पातळीत वाढ झाल्यामुळेही हृदयरोगाचा धोका 30 टक्‍क्‍यांनी वाढतो.

धूम्रपानाचे व्यसन, ताणतणाव (कामाशी किंवा इतर कोणत्याही बाबींशी संबंधित), निकस आणि अनारोग्यकारक आहार, शारीरिक व्यायामाची कमतरता आणि मीठ व पॅकेज्ड खाद्यपदार्थांचे अती प्रमाणात सेवन, ही प्रौढ तरुणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढण्याची प्रमुख कारणे आहेत.

या समस्यांवर नियंत्रण ठेवायचे तर मुळात त्यांना निमित्त ठरणाऱ्या गोष्टींचे प्रमाण कमी कसे करावे हे समजून घेणे आवश्‍यक आहे. पालकांनी आपल्या मुलांना नियमितपणे सकस आहार घेण्याची सवय लावली पाहिजे व त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे रक्‍तदाबासंबंधी समस्यांवर नियंत्रण राहू शकेल, कारण लठ्ठपणामुळे रक्तदाब वाढण्याची शक्‍यता जास्त असते.

आहारातील मिठाचे प्रमाणही नियंत्रणात ठेवायला हवे. त्यांना धूम्रपानातील धोके आणि रक्तपेशींवर निकोटिनचा कोणता परिणाम होतो हे समजावून सांगायला हवे. निकोटिनमुळे रक्‍तवाहिन्या चिंचोळ्या होतात व त्यातून रक्ताचे सहज वहन होत नाही. आहारावर नियंत्रण ठेवण्याचे खूप प्रयत्न करूनही आणि मुलांना शारीरिक कामांची सवय लावूनही रक्तदाब कमी होत नसेल तर त्वरित डॉक्‍टरांशी सल्लामसलत करून योग्य ती उपाययोजना करायला हवी.

तरुणांमध्ये वाढतोय ह्रदयरोग (भाग 2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)