हृदयरोग टाळण्यासाठी व्यसनांपासून दूरच रहा… (भाग 2)

-डाॅ. एस.एल.शहाणे 

हृदयरोग टाळण्यासाठी व्यसनांपासून दूरच रहा… (भाग 1)

दररोज हजारो लोक हार्टऍटॅकने मरतात. त्यामुळे हृदयाची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने आपले हृदय निरोगी ठेवण्याच्या काही टीप्स..

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्यायला हवी. त्यात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी होती. अशी तपासणी दरवर्षी करायला हवी.

हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा तसेच नियमित फलहार घ्यावा. संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखादया छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे.

तंबाखूचे सेवन टाळणे

धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण इतरांच्या तुलनेने दुप्पट ते तिप्पट आढळते. तंबाखूतील निकोटीन या घटकामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, रक्तातील चरबी वाढते, तिचे रक्तवाहिन्यामधील थर वाढतात व रक्त गोठण्याची प्रवृत्तीही वाढते. तंबाखूच्या बाबतीत तरी थोडीशी हरकत घ्यायला हरकत नाही’ हे असत्य आहे. तंबाखूचे सेवन मग तो थोड्या प्रमाणात का होईना, तब्येतीस घातक असते यात शंका नाही.

अतिमद्यपान टाळावे

दररोज थोड्या प्रमाणात (एक ते दीड पेग) मद्यपान केल्यास रक्तातील अपायकारक चरबी कमी होऊन एच.डी.एल. कोलेस्टेरॉल या लाभदायक घटकाचे प्रमाण वाढते, असे संशोधनात दिसून आले आहे; पण अतिमद्यपानामुळे शरीरातील इतर अवयवांवर होणारे अनिष्ट परिणाम व व्यसनाधीनतेची शक्‍यता लक्षात घेता दररोज मद्यपान न करणे हेच बरे. मद्यपानानंतर स्निग्ध आहार व मांसाहार जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे लठ्ठपणा उत्पन्न होऊ शकतो.

मानसिक ताण कमी करणे

जी माणसे स्वभावाने उतावळी, अती महत्त्वाकांक्षी, जास्तीत जास्त गोष्टी मिळविण्यासाठी आसुसलेली, तसेच लवकर चिडणारी व रागावणारी असतात त्यांना हृदयविकार होण्याचा धोका अधिक असतो. हृदयविकार झालेल्यांनी मानसिक तणावापासून दूर राहणे गरजेचे आहे. बरेचदा त्रासदायक गोष्टी आपण टाळू शकत नाही; पण अशा गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडू न देणे हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)