पुणे मनपा हद्दीतील रिंगरोडवरील हरकती-सूचनांवर आज सुनावणी

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. या रिंगरोडचा काही भाग वारजे आणि बावधन खुर्द या भागातून जात आहे. या दोन्ही ठिकाणी रिंगरोडमध्ये बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. यावर नागरिकांच्या हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या. यावर सहसंचालक नगररचना यांच्या नवीन प्रशासकीय इमारत विधानभवनसमोर या कार्यालयात मंगळवारी (दि.18) सुनावणी होणार आहे.

शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी “पीएमआरडीए’ने 110 मी रुंदीचा रिंगरोड प्रस्तावित केला आहे. वारजे व बावधन येथून जाणाऱ्या रिंगरोडच्या मार्गावर नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या. वारजे येथील न्यू अहिरे गावावर पुन्हा विस्थापित होण्याची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे या रिंगरोडला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला होता. या नागरिकांनी रिंगरोडमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार “पीएमआरडीए’ने नव्याने मार्गात बदल करून त्याचा नकाशा नागरिकांसमोर सादर केला. यावर नागरिकांकडून त्यांचे म्हणणे मागविण्यात आले आहे.

वारजे व बावधन खुर्द येथील प्रस्तावित रिंगरोडच्या मार्गावरील बाधित होणाऱ्या जमीन मालकांना यापूर्वीच सुनावनीसाठी उपस्थित होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार बावधन खुर्द येथील ग्रामस्थांनी दि. 18 रोजी सकाळी 11 वाजता तर वारजे येथील ग्रामस्थांना दुपारी 2 वाजता सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नगररचना विभागाचे सहसंचालक यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.