पुणे – महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पूर्वी कार्यरत असलेले कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. या कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण असून ते बरे होऊन घरीही जात आहे. पुण्यातील डॉ. भिसे मल्टिस्पेशिऍलिटी हॉस्पिटल संचालित कोविड केयर सेंटर महाळुंगे म्हाडा, चाकण येथे सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर्स, रुग्ण आणि स्टाफने मिळून आरोग्यदायी गुढी उभारली.
कोविड सेंटरमध्ये उभारलेली गुढी आरोग्यसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या साहित्यापासून तयार करण्यात आली होती. यामध्ये पीपीई कीट, मास्क, सॅनिटायझर यासह डॉक्टरचे स्टेथोस्कोप लावण्यात आले होते.
आरोग्यदायी गुढी उभारण्यासंदर्भात येतील डॉ. राज जाधव म्हणाले की, करोनाची लागण झालेला रुग्ण घाबरलेला असतो. आजारपणाचा अधिक ताण घेतल्याने रुग्णांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. ही भिती रुग्णांच्या मनातून काढण्यासाठी तसेच सकारात्मक विचार आणि प्रसन्न वातावरण निर्मितीसाठी गुढीपाडवा साजरा केला. रुग्णांची भीती कमी होऊन आणि त्यांना नवी ऊर्जा मिळावी यासाठी ही आरोग्यदायी गुढी उभारली आहे. या गुढीची पूजा साफसफाई कर्मचाऱ्यांच्या हातून करण्यात आल्याचं डॉ. राज यांनी नमूद केलं.