संतोष पवार
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ
सातारा – सातारा शहरालगतची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहूपुरी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे 40 हजार आहे. मात्र, येथील जनतेला शासनाच्यावतीने आरोग्याची कोणतीही सुविधा पुरवण्यात आली नाही. कमी लोकसंख्येच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरु झाली मग मोठ्या लोकसंख्येच्या शाहूपुरीकरांना ही सुविधा मिळत नाही. लोकप्रतिनिधीही त्याकडे लक्ष देत नाहीत. खासगी डॉक्टरांची इथे चलती आहे. परंतु खिशाला परवडत नसल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्याची परवड होत आहे.
कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शाहूपुरी परिसराचा समावेश आहे. म्हणजे शाहूपुरीत आजारी पडल्यास उपचारासाठी दहा किलोमीटरवरील कण्हेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे, अशी अपेक्षा करण्यातही अर्थ नाही. हा सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळच म्हणावा लागेल. शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत मोठ्या गतीने अनेक वसाहती निर्माण होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात ग्रामपंचायतीला म्हणावे तसे यश येत नाही.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जात असला तरी अनेकदा त्यात विस्कळितपणा येत आहे. अनेक ठिकाणी गळतीचे प्रकार होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. रस्त्यांची अवस्था दयनीय असून सर्वत्र नुसता धुरळा उधळत असल्याने त्याचाही नागरिकांना त्रास होत आहे. सांडपाणी व्यवस्थापन योग्य नसल्याने शाहूपुरीकरांमध्ये आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य, गटारगंगा रस्त्यावर त्यामुळे डासांची निर्मिती अशी भयानक परिस्थिती असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
शाहूपुरीची लोकसंख्या सुमारे 40 हजार असतानाही आतापर्यंत याठिकाणी आरोग्य केंद्र का उभे राहिले नाही, असा प्रश्न शाहूपुरीकरांना पडल्याशिवाय राहत नाही. वास्तविक शाहूपुरीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी आरोग्य केंद्रे आहेत. आरोग्य विभागाला शाहूपुरीचेच वावडे असल्याचे स्पष्ट होते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन याठिकाणी आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
शाहूपुरीकरांवर माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्याप्रमाणेच प्रेम केले आहे. शाहूपुरीच्या विकासात काहीही कमी पडू देणार नाही, असे ते वारंवार सांगतात. शाहूपुरीत सत्ताधारी आणि विरोधक हे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना मानणारेच आहेत. तरीही याठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. अंतर्गत राजकारणाचा फटका करदात्यांना बसू नये, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
या परिसरात शासनाच्या वतीने आरोग्याची कोणतीच सुविधा नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. वास्तविक शाहूपुरीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाले तर त्याचा फायदा गरजूंना होणार आहे. सद्यस्थितीत नागरिकांना जिल्हा शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय उरलेला नाही. सत्ताधारी -विरोधक यांनी अशा सामाजिक कार्यात एकजूट दाखवून शाहूपुरीचा नावलौकिक वाढेल असे काम करावे, अशी शाहूपुरीकरांची अपेक्षा आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी घ्यावा पुढाकार
शाहूपुरी ग्रामपंचायतीची नगरपंचायतीकडे वाटचाल सुरु आहे. मात्र, अद्यापही येथील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. ग्रामपंचायतीला सर्व भागात कामे करण्यास अडचणी येत आहेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांनी ग्रामपंचायतीला नक्की काय अडचणी आहेत, याची माहिती घेतली पाहिजे. दरवर्षी रस्त्यांची काही प्रमाणात कामे केली म्हणजे विकास झाला असे म्हणता येणार नाही. विकासाची संकल्पना समजून घेत सर्वांगीण विकास झाला पाहिजे, अशी शाहूपुरीकरांची अपेक्षा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर शाहूपुरीच्या विकासासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.