तुम्हाला काळी मिरीचे हे आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का ?

काळी मिरी तर आपल्या सर्वांना परिचितच आहे. आंब्याच्या झाडावर चढवलेला काळ्या मिरीचा वेल नाही, असं घर तर कोकणात शोधून सापडणार नाही. सुमारे दोन हजार वर्षांच्या आधीपासून भारतीय पाकशास्त्र आणि आयुर्वेदात काळ्या मिरीचा उल्लेख आढळून येतो. पूर्णतः भारतातच उगम असलेली मिरी मसाल्याचा पदार्थ म्हणून दक्षिण भारताप्रमाणेच दक्षिण आशियातील जावा, सुमात्रा, मादागास्कर व इतर अनेक देशात आढळून येते. मिरीचा छान हिरवागार वेल असतो आणि त्यास उष्ण, दमट हवामान मानवते.

समुद्र किनारपट्टीच्या ठिकाणी याची चांगली लागवड होते. विड्याच्या वेलाप्रमाणेच हाही वेल आपण कुंडीत लावू शकतो. प्राचीन काळी आणि आजही काळी मिरी हे एक व्यापाराचे उत्तम साधन होते. म्हणूनच त्यास ‘काळे सोने’ असेही म्हटले जायचे. चलन म्हणूनही मिरीचा वापर केला जाई. मसाल्याचा पदार्थ व औषधी म्हणून मिरीचे अनन्यसाधारण महत्त्व होते आणि आजही आहे.

वेलावर मिरीचे फळ घोसाच्या स्वरुपात आणि हिरवे असते. कच्ची फळे पाण्यात काही तास शिजवतात. त्यानंतर उन्हात किंवा मशिनच्या मदतीने वाळविल्यावर, त्याचा रंग काळा होऊन त्यावर सुरकुत्या येतात. म्हणूनच मग ती काळी मिरी म्हणून ओळखली जाते. काही वेळा त्यावर प्रक्रिया न करताच ती नुसती वाळवली जाते. हीच काळी मिरी पुढे औषधांसाठी, मसाला म्हणून, तसेच तेल व अर्क काढण्यासाठी वापरली जाते. मिरी, हिरवी मिरी, पांढरी मिरी, केशरी वा लाल मिरी या स्वरूपातही वापरली जाते. परंतु जास्त काळी मिरीच सर्वांना परिचित आहे आणि तीच जास्त करून वापरण्यात येते.

हिंदीत हिला काली मिर्च, मिर्च, गोलमिर्च म्हणतात. तर इंग्रजीत यास इश्ररलज्ञ झशशिी, झशशिी म्हणतात. याचे शास्त्रीय नाव आहे झळशिी पळर्सीीा आणि कूळ आहे झळशिीरलशरश. संस्कृतमध्ये मरिच या नावाने काळी मिरी प्रचलित आहे.

मरिचं कटुकं तीक्ष्णं दीपनं कफवातजित्‌ ।
उष्ण पित्तकरं रूक्षं श्‍वासशूलकृमीन्हरेत्‌ ।।
तद्रार्द्रं मधुरं पाके नात्युष्णं कटुकंगुरू ।।
कञ्चित्तीक्ष्णगुणं श्‍लेष्मप्रसेकिस्यादपित्तलम्‌ ।।

काळी मिरी औषधी गुणांनी संपन्न आहे. विविध आयुर्वेदीय औषधांमध्ये प्रामुख्याने काळी मिरीचा वापर केला जातो. मिरीमध्ये व्हिटॅमिन सी, ए, फ्लॅव्होनॉईड्‌स, कॅरोटिन आणि ऍन्टिऑक्‍सिडन्ट्‌सभरपूर प्रमाणात असतात. रोजच्या आहारात अर्धा चमचा मिरी पावडर वापरल्याने मिरीचे सर्व फायदे आपल्याला सहजगत्या मिळू शकतात. काळी मिरीमधील मुख्य घटक पॅपरीन, पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतो.

मिरी पावडर आहारात घेतल्याने जुलाब, बद्धकोष्ठ, ऍसिडिटी इ. त्रासांपासून आराम मिळतो. वाढलेले वजन कमी करण्यासाठी मिरपूड उपयोगी आहे. यामध्ये असलेले फायटोन्यूट्रियन्ट घटक फॅट्‌स कमी करण्यात क्रियाशील असतात. हे घटक फॅट्‌सच्या पेशी वाढण्याला अवरोध करतात. मिरपूड ही कमी उष्ण, कामोत्तेजक, पित्तकारक, कफ व वात हारक, रुचीकारक, कृमी व जंतूनाशक, श्‍वासहर अशी आहे.

कृमीनाशक असल्याने ही पोटातील जंतूसंसर्ग बरा करते. श्‍वासहर असल्याने अस्थमा व फुफ्फुसाशी संबंधित आजारात उपयुक्त ठरते. रुचीकारक असल्याने अन्नाची अरुची घालवून खाण्याची इच्छा उदयुक्त करते.जंतूनाशक असल्याने त्वचेसाठीही फायदेशीर आहे. फेसपॅकमध्ये माफक प्रमाणात घालून, चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावल्याने, मिरपूड चेहरा स्वच्छ करून त्वचा नितळ बनविते. डोक्‍यात कोंडा झाल्यास दह्यामध्ये मिरपूड मिसळून हे मिश्रण डोक्‍याला लावावे. अर्ध्या तासानंतर केस धुवून दुसऱ्या दिवशी शाम्पूने धुवावेत. कोंड्याची समस्या पूर्णपणे दूर होते.

सूप किंवा रसममध्ये चिमूटभर मिरपूड घालून गरम प्यायल्यास कफाचा त्रास बरा होतो. मिरीमधील पॅपरीन या घटकामुळे मेंदूच्या पेशींना उर्जा मिळते. त्यामुळे निराशा, डिप्रेशन इ. आजारांवर मिरपूड योग्य ती मदत करते. अधिक संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, व्हिटॅमिन सी, ए, फ्लॅव्होनॉईड्‌स, कॅरोटिन पेशींची वाढ रोखण्यात मिरपूड महत्त्वाची भूमिका बजावते. त्वचेचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर व स्तनांचा कॅन्सर रोखण्यात मिरपूड उपयुक्त आहे. मिरपूड आणि हळद एकत्रितपणे कॅन्सरला दुप्पट विरोध करतात. पॅपरीनबरोबरच यातील ऍन्टिऑक्‍सिडन्ट्‌स, व्हिटॅमिन सी, ए, फ्लॅव्होनॉईड्‌स, कॅरोटिनॉईड्‌स हे घटक कॅन्सरविरोधी काम करतात.

स्त्रियांचे मासिक पाळीतील त्रास मिरपूड आहारात नियमित घेतल्याने दूर होऊ शकतात. सर्दी, खोकल्यावर तर मिरपूड उत्तम आहे. मिरपूडीच्या वासाने शिंका येतात आणि चोंदलेले नाक मोकळे होते. यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे मिरपूड सर्दी, खोकल्यावर नैसर्गिक औषधी ठरते. सायनस, सर्दीमुळे होणारे डोकेदुखी इ. त्रास मिरपुडीमुळे बरे होतात. मिरपुडीमुळे जखमा बऱ्या होतात. त्वचेचा रंग व पोत सुधारतो. फ्ल्‌यूचा ताप आला असेल तर आहारात लगेच मिरपूड समाविष्ट करावी.

मिरपुडीमुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. तापामुळे होणारी डोकेदुखी, अरुची, पोटफुगी इ. त्रास दूर होतात. पोटदुखी, दातदुखी, केसांच्या समस्या अशा छोट्या-मोठया आजारांपासून ही चिमूटभर मिरपूड आपल्याला दूर ठेवते. मात्र मिरपूड प्रमाणातच घ्यावी. कारण मिरपूड जास्त प्रमाणात सेवन केल्यास ती उष्ण पडते. ‘ मूर्ती लहान, कीर्ती महान ‘ ही म्हण इथे बरोबर लागू पडते.

तर अशी ही काळी मिरी… आपल्या घरात हजर असतेच, पण नसेल तर जरूर आणून ठेवा. सूप, सलाड,सॅंडविच, शक्‍य असेल तिथे आवडीनुसार नक्की वापर करा. चिमूटभर मिरपूड निश्‍चितच तुम्हाला आरोग्याचे धन बहाल करेल. मिरीचा वेल कुंडीत आवर्जून लावा. तो शोभिवंत आहेच आणि आरोग्यादायीही आहे!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.