वैष्णवांच्या आरोग्यदायी सेवेसाठी डॉक्‍टर सज्ज

आळंदी – माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालय हे वारकऱ्यांच्या आरोग्यदायी सेवा सुविधांसाठी सज्ज झाले आहे. रविवार (दि. 23) ते बुधवार (दि. 26) पर्यंत आळंदी ग्रामीण रुग्णालयामार्फत अंतर रुग्ण व बाह्य रुग्ण हे दोन विभाग सतत तीन दिवस 24 तास सुरू राहणार असल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्‍टर जी. जी. जाधव यांनी सांगितले.

यात्रा कालावधीकरिता जादा डॉक्‍टर, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आंतरवासीय विद्यार्थी, क्ष-किरण तंत्रज्ज्ञ, चार रुग्णवाहिका असा ताफा यात्रा कालावधीत राहणार असून, पाच ठिकाणी यात्रेकरीता बुथची उभारणी करण्यात येणार आहे. यात 15 वैद्यकीय अधिकारी, 20 अधिपरिचारिका, 25 परिचर (वर्ग 4), सहा प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ, सहा औषध निर्माण अधिकारी, 15 अंतरवासिय विद्यार्थी, आठ क्ष-किरण तंत्रज्ज्ञ, दोन लहान व दोन मोठ्या रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. बाह्यरुग्ण विभाग चाकण चौक, दर्शन बारी, वडगाव रोड (गणेश मंदिर), माऊली मंदिर, इंद्रायणी घाट परिसर अशा पाच ठिकाणी बुथची उभारणी करण्यात येणार आहे.

ही सर्व आरोग्यदायी सेवा भाविकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पूर्णतः विनामूल्य देण्यात येणार आहे. याकामी डॉ. प्रकाश गुरुत्वाड, डॉ. वांगीकर, डॉ. संदीप गोरे, राणी राऊत आदींसह सर्व डॉक्‍टर, कर्मचारी, अधिकारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी दरवर्षी आषाढी व कार्तिकी या दोन्ही यात्रेच्यावेळी कार्यतप्तरतेने आपली जबाबदारी पार पाडतात.

Leave A Reply

Your email address will not be published.