खासगी डॉक्‍टरांकडून फोन, व्हॉटस ऍपवर आरोग्यसेवा

क्‍लिनिक बंद असल्याने नागरिक धास्तावले; मेडिकलबाहेर लागताहेत रांगा

पिंपरी – “करोना’ विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी बाह्यरुग्ण सेवा खासगी डॉक्‍टरांनी बंद केली आहे. मात्र फोन व्हॉट्‌स ऍपवर सर्दी, खोकला, ताप अशा रुग्णांना आरोग्य सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रुग्णालयातील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच रुग्णांची समस्या ही यामुळे दूर होत आहे.

वातावरणातील बदलामुळे नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला असे आजार दिसून येत आहेत. “करोना’च्या पार्श्‍वभूमीवर पालकांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे बालकांवर उपचारासाठी आपल्या नेहमीच्या डॉक्‍टरांकडे नोंदणी करण्यासाठी धडपड सुरु आहे. नोंदणीसाठी फोन केला असता ओपीडी बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पालक धास्तवले आहेत. तेव्हा खासगी रुग्णालयातील कर्मचारी डॉक्‍टरांच्या वैयक्‍तिक मोबाइलवर फोन करण्यास सांगत आहेत.
तसेच अनेक डॉक्‍टरांनी आपल्या रुग्णालयात याबाबत सूचना लिहिल्या आहेत. डॉक्‍टरांशी संपर्क साधत आजारासंदर्भात माहिती दिल्यास कोणती औषधे घ्यायची त्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे पालक, नागरिकांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

औषधे घेण्यासाठी गर्दी
फोनवर मिळालेल्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारे नागरिक मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी गर्दी करत आहेत. नागरिकांची गर्दी पाहता मेडिकल दुकानदारांकडून देखील आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत. योग्य अंतर राखण्याची व्यवस्था करण्यात आली असून नागरिक रांगेत उभे राहून औषधे घेत असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे. नागरिकही स्वतःच एकमेकांपासून अंतर बाळगून रांगेत उभे राहत आहेत.

संचारबंदी असल्याने फोनवरील माहितीचा फायदा
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशामध्ये संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे खासगी वाहने रस्त्यावर फिरकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या रुग्णाला रुग्णालयात नेताना अडचणी येतात. त्याऐवजी फोनवरून डॉक्‍टरांशी संपर्क साधून आजाराबाबत माहिती दिली जाते. तसेच डॉक्‍टर घ्यावयाच्या गोळ्या-औषधांची लिस्टही व्हॉट्‌स ऍपवर पाठवत आहेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या आरोग्याच्या तक्रारी सोडवता येत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.