नवी दिल्ली – केंद्र सरकारने आता आरोग्यसेतू अॅप डाउनलोड करा अन्यथा भारतीय संघात स्थान मिळणार नाही असा फतवा काढत देशाच्या हॉकीपटूंवर आदेशाचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.
देशात लॉकडाऊन आहे तसेच करोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे कोणत्या भागात करोनाचा प्रभाव जास्त आहे ते कळावे यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा अॅप विकसित केल्यानंतर देशपातळीवर याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रेड, ग्रीन व ऑरेंज झोन कुठे आहे, तेथील परिस्थिती कशी आहे याची सर्व माहिती तसेच त्याचे अपडेट काही सेकंदात खेळाडूंना मिळतील. तसेच यामुळे त्यांना आपली काळजी घेणे सुकर होईल असे हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे.
या अॅपच्या माध्यमातून खेळाडूंना स्वतःची प्रकृती, आरोग्य स्टेटस यांबाबत चाचणी करुन घेता येईल व स्पर्धेसाठी सहभागी होताना तसेच सराव सत्रात सहभागी होताना आपली व सहकारी खेळाडूंबाबत जागरुक राहता येणार आहे. हे अॅप जर डाउनलोड केले नाही तर या खेळाडूंना संघात स्थान मिळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रीय संघातील खेळाडूंनीच नव्हे तर संलग्न असलेल्या खेळाडूंसाठी हे बंधन आहे.