जाणून घ्या तांदूळजाचे (चवराई भाजी) औषधी उपयोग  

सुजाता टिकेकर 

तांदूळजाची भाजी पथ्याची आहे. कोणत्याही रोगात ही चालते. साधारण तोंडी लावण्यासाठी ही खातात. 

भाजी करण्याची पद्धत 
भाजी करताना एक पथ्य पाळावे ते म्हणजे ही भाजी तेलात कधीही करू नये कारण तेल विष उडवते. ही भाजी नुसती वाफवून तव्यावर परतून खावी. अथवा तूप, जिरे यावर परतून सैंधव, मिरे, आले याचे तिखट घालून खावी म्हणजे अनेक रोगांवर गुणकारी ठरते.

तोंडाला चव व भूक वाढविणारी भाजी आहे. तांदूळजा रुचकर असतो. तोंडाला रुची नसेल तेव्हा ही भाजी खाल्ल्याने रुची येते. तसेच तांदुळजा अग्निदीपक आहे. भूक लागत नसेल तर ही भाजी खाल्ल्याने भूक लागते.

लघवी व शौचास साफ होते
तांदूळजा हा मूत्रल आहे. म्हणजे लघवी साफ करणारा आहे. लघवीस कमी होत असेल अगर अडकत अडकत होत असल्यास ही भाजी दोन दिवस रोज खावी. लघवीला साफ होते.

शौचाला साफ होते 
तांदूळजा ही भाजी सारक आहे. ही भाजी खाल्ली असता परसाकडे साफ होते. तांदूळजाने परसाकडे साफ होते पण ही भाजी अतिसारात खाल्ल्याने परसाकडे कमी होते. म्हणून ही अतिसारी किंवा हगवण लागलेल्या माणसाने खाल्ली तर काही बिघडत नाही.

ताप कमी होतो
तांदूळजा ज्वरघ्न म्हणजे ताप कमी करणारा आहे. तापकरी आजाऱ्याने ही भाजी खाल्ली असता ताप वाढत नाही, कमी होतो. म्हणून ही तापात अत्यंत पथ्याची भाजी समजतात. इतके गुण तांदूळजात आहेत.

विषबाधा झाल्यास कमी करते
हिचा विशेष गुण म्हणजे ही विषघ्न आहे. कोणतेही विष पोटात गेले असता ही भाजी खावी; विषाची बाधा कमी पडते. ही इतकी विषघ्न आहे की वैद्य लोक विषारी औषधाचा विषार कमी करण्यासाठी तांदूळजाच्या रसात ते औषध खलतात. विषबाधा झाली असता तांदूळजाच्या पाल्याचा रस 12 मि. लि. रोज नियमाने पिण्यास द्यावा. विषबाधा होत नाही. ही भाजी नित्य खावी म्हणजे फायदा होतो.

मासिक पाळीच्या विकारात
तांदूळजाची भाजी मासिकपाळीच्या विकारात गुणकारी आहे. पाळी लांबली, पाळीची
अनियमितता यावर गुणकारी आहे.

कामवासना उद्दिपित करणारी
तांदूळजाची भाजी पुरुषाला वीर्यवर्धक आहे. कामवासना जागृत करणारी आहे.

पोटदुखीवर 
आठवड्यातून एकदा तरी ही भाजी साजूक तूपावर हिंग जिरी मिरीची फोडणी घालून परतून सैंधवमीठ घालून खावी. याने पोटदूखी थांबते.

अशाप्रकारे तांदूळजा हा आपल्या आहारात नियमित घ्यावा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)