ऑक्सिजनची मागणी वाढल्याने रुग्णांना अन्यत्र नेण्याची वेळ
पुणे – ऑक्सिजनची मागणी मोठ्याप्रमाणात वाढल्याने आज खासगी रुग्णालयांतील आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेतील ऑक्सिजनचा विषय ऐरणीवर आला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन संपल्याने तेथील रुग्ण अन्य रुग्णालयात नेण्याची वेळ आली असून, रुग्ण दगावण्याचेही प्रकार होत आहेत.
महापालिकेने सुमारे 9 हजार बेड ताब्यात घेतले आहेत. त्यातील 6 हजार हे ऑक्सिजन बेड आहेत. त्यामुळे एवढ्या बेड्सना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे. महापालिकेच्या दोन जम्बो हॉस्पिटल्स आणि अन्य रुग्णालयातील ऑक्सिजन बेड यांना मिळून 50 टन ऑक्सिजन लागतो. याशिवाय पूर्ण जिल्ह्यात 300 टन ऑक्सिजन लागतो. परंतु सध्या ऑक्सिजनची गरज असलेल्या बाधितांची संख्या वाढल्याने हा ऑक्सिजन कमी पडत आहे, त्यामुळे खासगी रुग्णालये अक्षरश: ऑक्सिजन विषयात “व्हेंटिलेटरवर’ आले आहेत.
10 ते 50 खाटांच्या दवाखन्यांमध्ये काही बेड ऑक्सिजनवरील असतात. तेथेही आता बरेच क्रिटिकल, ऑक्सिजनची गरज असणारे रुग्ण दाखल झाले आहेत. या छोट्या रुग्णालयांकडे ऑक्सिजन साठवणुकीच्या टाक्या नसतात, तर त्यांची मदार सिलिंडरवर असते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनची साठवणूक करता येत नाही. याशिवाय सिलिंडर भरून ठेवता येत नाही, कारण रिफिलींगसाठी सिलिंडरच शिल्लक नसतो. आता तर तुटवडाच असल्याने सिलिंडरही भरून मिळत नसल्याची स्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे सध्या त्यांच्यावर आपत्कालिन स्थिती ओढवली आहे.
300 टन ऑक्सिजनची मागणी
जिल्ह्यात 380 टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असलेल्या कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या चाकण परिसरात आहे. तर संपूर्ण जिल्ह्याची फक्त करोनासाठी 300 टनांची डिमांड आहे. याठिकाणाहून हा ऑक्सिजन पुरवठा होत असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही शहरांमध्ये येथूनच ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.
ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनीही ऑक्सिजन पुरवठ्यातील समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र टीम तैनात केल्या आहेत. परंतु ऑक्सिजनचा पुरवठा हा विषय जिल्हाधिकारी आणि अन्न, औषध प्रशासन यांच्या अखत्यारित येत आहे. त्यांच्याजवळ आम्ही आमची मागणी नोंदवली आहे.
– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त, पुणे महापालिका