फ्रान्समध्ये आता सार्वजनिक ठिकाणी आरोग्य पास अनिवार्य

पॅरिस   – फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरण्यासाठी आता आरोग्य पास अनिवार्य करण्यात आला आहे. आयफेल टॉवर आणि फ्रान्समधील प्रसिद्ध संग्राहलयांना भेट देण्यापूर्वी पर्यटकांना हा आरोग्य पास मिळवावा लागणार आहे.

थिएटर आणि गर्दी असलेल्या सर्वच सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी हा आरोग्य पास बरोबर बाळगणे अनिवार्य असणार आहे. आजपासूनच हे आरोग्यविषयक नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. फ्रान्समध्ये नवीन डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे हे नियम लागू करण्यात आले आहेत.

हा आरोग्य पास मिळवण्यासाठी नागरिकांनी दोन्ही लस घेतलेले असावे. करोना विषाणूची चाचणी निगेटिव्ह असावी किंवा अलिकडेच करोनामधून बरे झाले असल्याचा पुरावा सादर करणे गरजेचे असणार आहे. देशातील सर्वच सांस्कृतिक आणि पर्यटन स्थाळांवर जाण्यासाठी हा आरोग्य पास अनिवार्य असणार आहे.

या आरोग्य पासबाबतच्या विधेयकावर संसदेच्या कनिष्ठ सभागृहात चर्चा सुरू झाली आहे. अजून हे विधेयक संसदेच्या वरिष्ठ सभागृहात मांडले जाणार आहे. फ्रान्समध्ये अलीकडच्या काळापर्यंत करोनाच्या रुग्णांची संख्या मर्यादित होती. मात्र गेल्या दोन आठवड्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.