महाराष्ट्रासारख्या राज्यांमधील लसींच्या तुटवड्याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे मौन

नवी दिल्ली – देशातील लोक करोना निर्बंधांच्याबाबतीत अत्यंत ढिलाईने वागले त्यामुळेच देशात पुन्हा करोना वेगाने फोफावला आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. करोनाविषयक निर्बंध किती महत्वाचे आहेत याची या निमीत्ताने जनतेत पुन्हा जाणिव निर्माण करणे आणि त्याचे महत्व त्यांना पुन्हा पटवून देणे हे आवश्‍यक झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशातील करोना स्थिती आणि लसीकरणाचा आढावा एका बैठकीत घेतला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान या अकरा राज्यातच देशातील एकूण 54 टक्के रूग्ण आढळून आले आहेत. 

महाराष्ट्र आणि पंजाबात करोनामुळे मरण पावलेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे असेही त्यांनी नमूद केले. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून या राज्यांमध्ये करोनाची लक्षणीय वाढ दिसून आली असून 15 ते 44 वयोगटातील नागरीकांचा त्यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

मृतांमध्ये 60 वर्ष वयाच्या वरील व्यक्तींची संख्या अधिक आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. या लाटेच्या नियंत्रणासाठी केंद्र सकारतर्फे आवश्‍यक ती सगळी मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली पण त्यांनी ही मदत नेमकी कशी असेल व ती कधी दिली जाणार आहे यावर काहीच भाष्य केले नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे त्यावर काय उपाययोजना केली यावरही डॉ. हर्षवर्धन यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.