मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मास्कसक्तीबाबत सुचक इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मास्क सक्ती होणार असल्याची शक्यता आहे. मुंबई शहरात अचानक करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यभरात आरोग्यविभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. राज्यात करोना टेस्ट वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने त्या ठिकाणची वाढती रुग्ण संख्या चिंता करायला लावणारी आहे. त्यासाठी ज्या भागात रुग्ण संख्याचा आकडा वाढत आहे त्या ठिकाणी टेस्टिंग संख्या वाढवण्याची गरज आहे, म्हणून टेस्टिंग वाढवण्याबाद निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
मास्क वापराबाबत टोपे म्हणाले की, वाढती रुग्ण संख्या पाहता मास्क सक्ती जरी नसली तरी मास्क बाबत नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, लोकांनी अलर्ट राहावं. नाहीतर मास्क सक्तीचा विचार करावा लागेल असा इशारा ही यावेळी त्यांनी दिला आहे.