पुणे – ‘जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून जास्तीत जास्त रुग्णांना येथे सेवा द्यावी. इतर व्याधी असणाऱ्या करोना रुग्णांना सर्व उपचार मिळावेत, यासाठी संबंधित सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर नियुक्त करावेत,’ अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटरची पाहणी करून आढावा बैठक घेतली. यावेळी प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जम्बो सेंटरमधील करोना रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचे पुष्पगुच्छ, मास्क देऊन आरोग्यमंत्री टोपे यांनी स्वागत केले आणि त्यांची विचारपूस केली.
जम्बो सेंटरमधील उर्वरित बेड्स कार्यान्वित करावेत. येथे स्वच्छता, आरोग्यदायी जेवण देण्यात येत आहे. त्यात सातत्य ठेवावे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रात्रसेवेत वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी. 02025502110/ 25502525/ 26 या हेल्पलाइन क्रमांकांचा नागरिकांनी वापर करावा. तसेच, प्लाझ्मा संबंधी व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र पथक असावे, अशा सूचना टोपे यांनी यावेळी दिल्या.