मोठी बातमी ! 25 जिल्ह्यांमध्ये करोनाचे निर्बंध शिथिल; राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई – राज्यातील 25 जिल्ह्यांमधील करोनाचे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत 11 जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक झाली त्यात हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

या 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम –

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत. तसेच या जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई लोकल प्रवासाबाबत बोलताना टोपे म्हणाले, ‘मुंबईत करोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, या सगळ्याचं नियोजन करण्याचा भाग हा रेल्वेच्या अखत्यारीत असणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील.’

हे निर्बंध शिथिल होणार –

  • शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकानं सुरू आणि फक्त रविवारी बंद.
  • खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यास अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू.
  • शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकणार.

दरम्यान, आज जी चर्चा झाली त्याबाबत आरोग्य विभाग आणि करोना टास्क फोर्सचा अहवाल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. पुढील १-२ दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.