आरोग्यविषयक प्रबोधनासाठी “हेल्थ गॅलरी’

आरोग्याशी निगडीत विविध मुद्द्यांबाबत पोस्टरद्वारे माहिती

 

पुणे – सर्वसामान्यांचे आरोग्यविषयक प्रबोधन करण्यासाठी पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर येथील डॉ. दळवी रुग्णालयात “हेल्थ गॅलरी’ उभारली आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्याशी निगडीत विविध मुद्द्यांबाबत सोप्या भाषेत माहिती देणारे पोस्टर लावले आहेत. विशेष म्हणजे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामे सांभाळून हे पोस्टर्स तयार केले असून, पुढील आठवडाभर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले आहे.

नुकतेच या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी स्थानिक नगरसेविका सोनाली लांडगे, महापालिका सहायक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक आणि डॉ. कल्पना बळीवंत, रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. माधुरी पवार, डॉ. रेखा कोकर्डे आदी उपस्थित होत्या.

करोना संकटकाळात दळवी रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. आता करोनाचे सावट कमी झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवी उमेद निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यांतर्गत रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या महिनाभरात दैनंदिन कामे सांभाळून हाताने पोस्टर्स तयार केले आहेत.

त्या माध्यमातून क्षयरोग, एचआयव्ही, मलेरिया, करोना अशा विविध आजारांची कारणे आणि त्यावरील उपचार, कुटुंब नियोजन, एक्‍स रे, विविध इंजेक्‍शन, जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन, ऑक्‍सिजन प्रकल्प अशा विविध विषयांची सहज सोप्या भाषेतील शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे. आठवडाभर हे पोस्टर प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.