पुणे – राज्यातील आरोग्य विभागात अधीक्षकांच्या पदासह अन्य विभागांतील अधिकाऱ्यांचे वेतन काढण्यावरून आंदोलन सुरु आहे. तर आता लिपिकांपासून ते अधीक्षक संवर्गातील पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, सहायक अधीक्षक तसेच अधीक्षक संवर्गातील एकूण मंजूर पदांपैकी सुमारे 988 पदे रिक्त असल्याने या वर्गातील कर्मचाऱ्यांनी रिक्त जागा भरण्याची मागणी केली आहे.
आरोग्य विभागात विविध प्रस्तावांपासून ते फाइल्समधील टिपण्णी तयार करण्यापर्यंतची सर्व काम लिपिक वर्ग करतात. त्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. त्यामुळे आरोग्य खात्यासह कोणत्याही खात्यामध्ये लिपिक वर्गासह अधीक्षक वर्गाच्या पदांना महत्त्व अधिक आहे.
परंतु, ही पदे रिक्त असल्यास उर्वरीत कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. विभागामध्ये आजमितीला अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक अशी विविध पदे कार्यरत आहेत. ही एकूण 3 हजार 487 पदे मंजूर असून त्यापैकी 2 हजार 322 पदे भरलेली आहेत. तसेच 988 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यात यावी, अशी राज्यातील कर्मचारी वर्गाकडून मागणी होत आहे.