आरोग्य विभागाला सोमवारपर्यंत”अल्टीमेटम’

शहरातील कचरा समस्येबाबत उपमहापौरांनी घेतली बैठक

पिंपरी  – शहरातील विविध भागांमध्ये कचरा व्यवस्थित उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. गेल्या पाच दिवसांपासून नव्या निविदेनुसार हे काम सुरू झाले असले तरीही सध्या प्राधिकरण, आकुर्डी, पिंपळे सौदागर अशा विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढिग पाहण्यास मिळत आहे.

शहरातील कचरा उचलण्याचे काम सोमवारपर्यंत (दि. 8) सुरळीत करण्याचा “अल्टीमेटम’ शुक्रवारी उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आरोग्य विभागाला दिला. त्यानंतरही कचरा व्यवस्थित उचलला न गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका घेतली जाणार आहे.

शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याचे काम नव्या निविदेनुसार 1 जुलैपासून सुरू झाले. मात्र, गेल्या सुरुवातीपासूनच या कामात विस्कळीतपणा आला आहे. विविध भागांतील कचरा व्यवस्थित उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

प्राधिकरण, आकुर्डी आदी भागांमध्ये सध्या कचऱ्याचे ढीग पाहण्यास मिळत आहे. तीच परिस्थिती पिंपळे सौदागर भागातही आहे. पिंपळे सौदागरमध्ये सोसायट्यांचे प्रमाण जास्त आहे. येथे ही समस्या व्यापक प्रमाणात जाणवते आहे. कचरा वाहतुकीसाठी सध्या उपलब्ध होणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे वेळच्या वेळी कचरा उचलला जात नाही. पर्यायाने, कचऱ्याचे ढीग साचत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, महापालिका भवनात उपमहापौर चिंचवडे यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. तसेच, अधिकाऱ्यांना या समस्येचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, डॉ. लक्ष्मण गोफणे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, स्वीकृत सदस्य ऍड. मोरेश्‍वर शेडगे, माजी नगरसेवक राजू दुर्गे आदी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.