एक जण जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली
नगर – नगर जिल्ह्यात चीनमधून काही नागरिक आले आहेत. कंपनीच्या कामासाठी हे नागरिक चीनमध्ये गेले होते, ते आता परतले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने या नागरिकांशी संपर्क साधून त्यांची आरोग्य तपासणी केली आहे. परंतु, या नागरिकांमध्ये कोणत्याही आजाराचे लक्षण आढळलेले नाही.
शिवाय, या नागरिकांना येऊन चौदा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून, नागरिकांची प्रकृती ठणठणीत आहे,.त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले असून, एका युवकाला जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
चीनमधील वुहान प्रांतात कोरोना व्हायरसची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. हा आजार चीनबरोबरच अन्य देशांतही फैलावला आहे. भारत देशातही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपायोजना सुरू केल्या आहेत.
चीनमधून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत, त्यानुसार राज्यात सर्वत्र चीनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाकडून या नागरिकांशी काही दिवस नियमित संपर्क साधला जाणार आहे. हे नागरिक चीनमधून आलेले असले तरी वुहान शहरातून आलेले नाहीत, चीन देशातील अन्य भागातून आले आहेत, असेही जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.