सीसीटीव्हीची यंत्रणा बासनात गुंडाळली?

जिल्ह्यातील आरोग्य केंद्र रामभरोसे : घोषणाबाजीत आरोग्य विभाग आघाडीवर

पुणे – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कामकाज आणि रूग्णाला वेळेत उपचार दिले जातात का? यावर देखरेख ठेवण्यासाठी काही प्रमुख आरोग्य केंद्रामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची “घोषणा’ आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. त्या घोषणेला अनेक महिने झाले, तरी अद्याप आरोग्य केंद्रामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसलेली नाही. त्यामुळे केवळ घोषणाबाजीमध्ये आरोग्य विभाग आघाडीवर असून, प्रत्यक्ष सीसीटीव्ही यंत्रणा कधी बसवणार असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्र तर 534 आरोग्य उपकेंद्रे आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डिजीटल करण्यात येणार असून, तेथील आरोग्य सेवा सुरळीत चालते का, डॉक्‍टर आणि कर्मचारी वेळेत येतात का, रूग्णाला वेळेत उपचार दिले जातात का यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्ह्यातील 35 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार असून, ही सर्व केंद्र इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. त्यासाठी 20 लाख रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, त्याला मान्यताही देण्यात आली आहे. त्यामुळेच लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल, असे अश्‍वासन आरोग्य विभागाने दिले.

दरम्यान, आरोग्य केंद्रात डॉक्‍टर किंवा कर्मचारी उपलब्ध नाही, स्वच्छतेचा अभाव, औषधांचा पुरेशा साठा नाही, रूग्णांची हेळसांड होते अशा अनेक तक्रारी आरोग्य विभागाकडे वारंवार येत असतात. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी आणि आरोग्य केंद्रातील रूग्णसेवा सुरळीत होण्यासाठी ही सीसीटीव्ही यंत्रण महत्त्वाची आहे. परंतू, मागील काही महिन्यांपासून केवळ आश्‍वासनांवरच यंत्रणा सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. याबाबत जून महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावेळी येत्या आठ दिवसात सीसीटीव्ही यंत्रण बसेल, असे सांगण्यात आले. मात्र, त्यालाही आता एक महिना होवून गेला असून, अद्याप सीसीटीव्ही यंत्रणा बसली नाही. त्यामुळे आरोग्य विभाग करते काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सीसीटीव्ही यंत्रणेमुळे केंद्राला शिस्त लागेल

जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रावर वेळेत रूग्णांना उपचार दिले जातात. मात्र, काही केंद्रांवर उपचार मिळण्यास हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्रामध्ये डॉक्‍टर उपलब्ध नसणे, अस्वच्छतेचा अभाव दिसून येतो. त्यामुळे हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी, आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर, कर्मचारी यांना शिस्त लागावी आणि रूग्णांना वेळेत उपचार मिळतात का यावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वपूर्ण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)