जिल्ह्यातील साथीचे रोग रोखण्याच्या सूचना
रेडा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात साथीच्या रोगांसह सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशासह विविध आजारांच्या लसी, औषधगोळ्या यांचा मुबलक पुरवठा तसेच साठा असावा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्वतः जिल्ह्यामध्ये भेटी देऊन आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करावा. यासह जिल्ह्यात विविध आरोग्य केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी करणार असल्याने गोरगरीब नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी यंत्रणेने सज्ज राहावे, अशी सूचना सभापती प्रवीण माने यांनी केली आहे.
जिल्ह्यातील साथीच्या रोगांचे वाढते प्रमाण पाहता जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे सर्व सदस्य यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी माने बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, प्रमोद काकडे, विठ्ठल आवाळे, नितीन मराठे, गुलाब पारखे यांच्यासह सर्व आरोग्य विभागाचे पदाधिकारी अधिकारी सदस्य उपस्थित होते.
प्रवीण माने म्हणाले की, जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र साथीच्या रोगांची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने यावर तातडीने उपाय योजना करण्यासंदर्भात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली. यामध्ये आरोग्याधिकारी यांच्यासह आशा वर्कर, आरोग्य सेवक यांना आरोग्य विषयक जनजागरण मोहीम हाती घेण्यासह उपाय योजना राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच आशा वर्कर, आरोग्य सेवक यांनी जनजागरण मोहीम हाती घ्यावी तसेच डेंग्यू सारखा आजार होऊ नये म्हणून पाणी वाहते ठेवावे, औषध फवारणी करणे, धुरळणी करणे अशा उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही केल्या आहेत. डेंग्यू, मलेरिया, खोकला, गोचीड ताप, अंगदुखी याकडे नागरिकांनी दुर्लक्ष न करता नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.