#आहारसंपदा : वांग्यांची भाजी फायदे आणि तोटे

-स्मिता जोशी 

वांगी :- वांगी ही भारतातील अत्यंत लोकप्रिय भाजी आहे. परंतु पूर्वीपासून ती दिवाळीपूर्वी खाऊ नयेत असे सांगितले जाते.कारण वांगी उष्णतावर्धक असल्यामुळे उन्हाळ्यात ती पित्तकारक ठरतात. वांगी कफनाशक असल्यामुळे हिवाळ्यात तसेच कफप्रकृतीच्या लोकांना ती हितकारक ठरतात. वांगी वर्षातून दोनदा पिकवली जातात. पण उन्हाळ्यातील वांगी थंडीतील वांग्यापेक्षा कमी चविष्ट असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वांगी मधुर, तिखट, उष्ण, कफनाशक असतात. वांग्यात कॉर्बोहायड्रेट, चरबी, प्रोटीन, जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असल्याने भाजी करताना देठाचा वापर करावा. महाराष्ट्रात कृष्णेकाठची वांगी व गुजरातमध्ये तापीच्या किनारी होणारी भरीताची मोठी वांगी प्रसिद्ध आहेत. वांगी जेवढी कोवळी तेवढी ती अधिक गुणयुक्‍त व शक्‍तीवर्धक असतात. वांगी आरोग्यदायक असूनही पित्तप्रकृतीच्या, उष्णप्रकृतीच्या, मूळव्याध व आम्लपित्त असणाऱ्या लोकांना ती बाधक ठरतात.

गृहोपयोगी कानमंत्र :-

* वायुप्रकृती असणाऱ्या लोकांनी गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून वांग्याच्या भाजीत तेल व हिंग जास्त घालावे.
* वांग्याची भाजी खाल्ल्याने लघवीचे प्रमाण वाढते व मूत्रमार्गातील छोटासा मुतखडा विरघळून जातो.
* कोवळे वांगे विस्तवावर भाजून मधात कालवून संध्याकाळी चाटून खाल्ल्याने चांगली झोप येते. निद्रानाशाचा त्रास होत असल्यास थोडे दिवस नियमितपणे हा प्रयोग करावा.

वांग्याचे काप –

साहित्य :- बिनबियांचे मोठे वांगे (भरीताचे वांगे) डाळीचे पीठ, तांदूळ पीठ, तिखट, मीठ.

कृती :- वांग्याचे पातळ गोल काप करा. त्यांना तिखट, मीठ लावून ठेवा. डाळीचे पीठ, थोडे तांदळाचे पीठ, तिखट, मीठ एकत्र करून हे कोरडे पीठ कापांना लावा. तव्यावर कडेने तेल सोडून मंद गॅसवर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

तेलवांगे –

साहित्य :- 5 वांगी, 1 मोठा कांदा, 1 छोटा टोमॅटो, काळा मसाला, तिखट, मीठ, कोशिंबीर, तेल.
कृती :- कढईत तेलाची फोडणी करून उभा पातळ चिरलेला कांदा, वांग्याचे तुकडे, टोमॅटो, मसाला, तिखट, मीठ घालून एक वाफ आणा. परत एक चमचा तेल घालून वाफ द्या. पाणी घालू नका. भाजी शिजल्यावर कोथिंबीर घाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)