गाबा (ब्रिस्बेन) – ट्रॅव्हीस हेड याची नाबादी शतकी खेळी व सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लेबुशेन यांच्या अफलातून खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत गुरुवारी दुसऱ्या दिवस अखेर आपल्या पहिल्या डावात खेळ थांबला तेव्हा 7 बाद 343 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा पहिला डाव 147 धावांवर गुंडाळत ऑस्ट्रेलियाने या कसोटीच्या पहिल्याच दिवशी वर्चस्व मिळवले होते. त्यांच्याकडे आता 196 धावांची आघाडी आहे.
बुधवारी इंग्लंडचा पहिला डाव दुसरे सत्र संपण्यापूर्वीच दीडशतकी धावांच्या आत संपवल्यावर तिसरे सत्र संततधार पावसाने वाया गेले होते. त्यामुळे गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरू झाला. सलामीवीर रायम हॅरिस लवकर बाद झाल्यानंतर वॉर्नरने मार्नस लेबुशेनच्या साथीत संघाचा डाव सावरला.
या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी दीडशतकी भागीदारी केली. लेबुशेन 117 चेंडूत 6 चौकार व 2 षटकार फटकावत 74 धावांवर बाद झाला. दरम्यान, वॉर्नरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. स्टिव्हन स्मिथने निराशा केली. त्यानंतर हेडने वॉर्नरला सुरेख साथ दिली. वॉर्नर शतकाच्या उंबरठ्यावर असताना 94 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत एका जीवदानाचा लाभ घेत 176 चेंडूत 11 चौकार व 2 षटकार फटकावले.
दरम्यान, हेडने आपले अर्धशतक पूर्ण करत शतकाकडे कूच केली. तो जास्त आक्रमक फलंदाजी करत होता. कॅमेरून ग्रीन, अलेक्स केरी व कर्णधार पॅट कमिन्स यांनी साफ निराशा केली. यावेळी मिशेल स्टार्कने हेडला साथ देत संघाला त्रिशतकी धावांच्या पुढे मजल मारून दिली. हेडने आपले शतक साकार केले. त्याने नाबाद 112 धावांच्या खेळीत केवळ 95 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली.
खेळ थांबला तेव्हा त्याच्यासह स्टार्क 10 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडे 196 धावांची आघाडी असून, या कसोटीत ते पहिल्या दिवसापासूनच विजयाच्या मार्गावर आले आहेत. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सनने 3 गडी बाद केले. ख्रिस वोक्स, मार्क वूड, जॅक लीच व कर्णधार ज्यो रूट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड पहिला डाव – 147 धावा. ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 84 षटकांत 7 बाद 343 धावा. (डेव्हिड वॉर्नर 94, मार्नस लेबुशेन 74, ट्रॅव्हीस हेड खेळत आहे 112, मिशेल स्टार्क खेळत आहे 10, ओली रॉबिन्सन 3-48, ज्यो रूट 1-29, ख्रिस वोक्स 1-56, मार्क वूड 1-57, जॅक लीच 1-95).